पुणे | बनावट पावत्यांद्वारे वसुली करणारे मोकाटच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मार्केट यार्डात बनावट पावत्यांद्वारे लाखो रुपयांचे पार्किंग़ शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस येऊन त्याला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
त्यामुळे बनावट पावत्यांमधून बेकायदा शुल्क वसुली कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर बाजार समितीने पोलिसांना ई-मेल पाठविला आहे. मात्र, त्याचा पाठपुरावाच केला नाही.
त्यामुळे अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. अशा प्रकरणामध्ये फसवणूक झालेल्या तक्रारदाराने स्वत: तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल होतो, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे बाजार समिती या प्रश्नाचा पाठपुरावा करणार आहे का, दोषींवर गुन्हा दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
जिल्ह्यासह विभाग, राज्य आणि परराज्यातून येथे शेतीमालची आवक होते. शेतकरी माल विक्रीसाठी वाहने घेऊन येत असतात. त्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या असतात, तर कधी नो पार्किंगमध्येच असतात. त्यातही नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांना बनावट पावत्या देऊन नो पार्किंगची शुल्क वसुली केली जात आहे. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
बाजार समितीच्या पावत्याप्रमाणेच या पावत्या हुबेहूब आहेत. या बनावट पावत्या बाजार समितीकडे देण्यात आल्या आहेत. त्या पावतीवरून गाडीच्या नंबरची पाहणी केली असता, संबंधित गाडी शेतीमाल विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारे अनेक गाड्यांकडून बनावट पावत्याद्वारे दंड वसुलीचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेला १५ दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल झालेला नाही. बाजार समितीने ई-मेल पाठविण्याचे केवळ कर्तव्य केले. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावाच केला नाही.
त्यामुळे बाजार समितीचे अधिकारी, ठेकेदार अथवा जवळच्या कोणाचा सहभाग आहे का? त्याला वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बनावट पावतीवर गाडी क्रमांक आहे. त्याद्वारे गाडी मालकापर्यंत पोहोचून गुन्हा दाखल करावा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. या प्रक्रियेद्वारे लवकरच गुन्हा दाखल होईल. बनावट पावत्या बनविणाऱ्यांचा पर्दाफाश होईल. – डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे




