मोहटादेवी : श्रद्धेपासून सेवाधर्मापर्यंत
Mohatadevi : धर्म, संस्कृती, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम असलेले पाथर्डीचे श्रद्धास्थान

Mohatadevi : पाथर्डी शहरापासून पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर गर्भगिरी पर्वतरांगेत वसलेला श्रीक्षेत्र मोहटादेवी गड हा केवळ धार्मिक श्रद्धेचे ठिकाण राहिलेले नाही. श्रद्धा, लोकपरंपरा, संस्कृती, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारे हे महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनानेही मोहटादेवीचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उल्लेख केला आहे.
माहूरच्या रेणुकामातेचा अंशावतार, स्वयंभू व जागृत देवस्थान आणि भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी मोहटादेवीची लोकश्रद्धेतील ओळख आहे.
आख्यायिकेपासून देवस्थानापर्यंत
मोहटादेवीच्या प्रचलित इतिहासात नवनाथांची तपश्चर्या, रेणुकामातेचे प्राकट्य आणि दहिफळे घराण्यातील भक्त बन्सीबाबा यांच्या भक्तीचा संदर्भ येतो. बन्सीबाबांच्या भक्तीला प्रतिसाद देत रेणुकामाता मोहट्याच्या डोंगरावर प्रकट झाली, अशी श्रद्धा आहे. हे प्राकट्य अश्विन शुद्ध एकादशीशी जोडले जाते आणि त्याच दिवशी मोहटादेवीची यात्रा भरते, अशी परंपरा आहे.
म्हशींच्या रंगबदलाची कथा, भक्तांचा नवस आणि दहिफळे कुटुंबीयांमध्ये दूध-दही-तूप विक्री न करण्याची परंपरा अशा अनेक आख्यायिका मोहटादेवीच्या लोकस्मृतीचा भाग आहेत. या कथा लिखित इतिहासापेक्षा स्थानिक लोकश्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहणे अधिक उचित आहे.
काळाच्या ओघात भाविकांची संख्या वाढत गेली. पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून नवे श्रीयंत्राधारित मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या रचनेत श्रीयंत्राच्या संकल्पनेचा वापर करण्यात आला असून दर्शनरांगांमध्ये महागणपती, दत्तात्रेय, रुख्मिणी-पांडुरंग, उमामहेश्वर, गुरु भगवानबाबा, गुरु वामनभाऊ महाराज यांच्यासह चौसष्ट योगिनी, दशमहाविद्या आणि अष्टभैरव यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
वास्तुरचनेतून शक्तीपरंपरेचे दर्शन
सुमारे ८८ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारलेल्या श्रीयंत्राकार मंदिर-संकुलाची संकल्पना ही श्रद्धा आणि वास्तुरचनेचा अनोखा संगम म्हणून पाहता येते. श्रीयंत्र, चौसष्ट योगिनी, दशमहाविद्या आणि अष्टभैरव यांच्या माध्यमातून भारतीय शक्तीउपासनेच्या विविध संकल्पना एका धार्मिक परिसरात एकत्रितपणे मांडल्या आहेत.त्यामुळे मोहटादेवी गडाचे महत्त्व केवळ देवदर्शनापुरते मर्यादित राहत नाही; भारतीय धार्मिक प्रतिके, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक स्मृती यांचे दर्शन घडविणारे केंद्र म्हणूनही त्याकडे पाहता येते. अधिकृत देवस्थानाच्या माहितीतही या रचनेला धार्मिक पर्यटनाच्या संदर्भात महत्त्व दिले आहे.
शिक्षण : सेवाकार्याचा केंद्रबिंदू
मोहटादेवीच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा सामाजिक पैलू म्हणजे वंचित मुलांसाठी शिक्षणाची उपलब्धता.
ऊसतोडणी कामगारांच्या तसेच एकल मातांच्या मुलांसाठी रेणुका विद्यालय, मोफत वसतिगृह आणि शैक्षणिक मदत देण्याचा उपक्रम हा धार्मिक संस्थेच्या सामाजिक भूमिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, यासाठी दिलेला आधार हा केवळ मदतकार्य नसून पुढच्या पिढीच्या सामाजिक उन्नतीत केलेली गुंतवणूक आहे.
संस्कृती जपणारे व्यासपीठ
धार्मिक यात्रा आणि उत्सव हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचेही वाहक आहेत. मोहटादेवीच्या परिसरात लोककलावंतांच्या हजेऱ्यांना व्यासपीठ मिळणे, पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणे आणि कीर्तन-प्रवचनातून समाजप्रबोधन करणे, या उपक्रमांना त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त होते.
रेणुकाभक्त विष्णुदास यांच्या नावाने उभारलेला कीर्तन मंडप ही या सांस्कृतिक परंपरेची आणखी एक सांगड मानली जाते. कीर्तन, प्रवचन आणि लोककला यांमधून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक संदेशही जनतेपर्यंत पोहोचतो.प्रत्येक पौर्णिमेला कीर्तनाद्वारे समाजप्रबोधनाची परंपरा असल्याचा उल्लेख उपलब्ध माहितीत आढळतो.
आखाड्यातील शक्तीची उपासना
मोहटादेवी म्हणजे शक्तीची उपासना. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शक्ती, शौर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे कुस्तीच्या हंगामाला दिले जाणारे प्रोत्साहन हे धार्मिक परंपरेशी जोडलेले सांस्कृतिक कार्य ठरते.
आखाड्यातील शिस्त, मेहनत आणि जिद्द यांना प्रोत्साहन देणे म्हणजे तरुण पिढीच्या शारीरिक संस्कारालाही हातभार लावणे होय.
अन्नदान आणि गरजूंसाठी मदतीचा हात
मोहटादेवी गडावरील अन्नदान आणि प्रसादव्यवस्था ही भाविकसेवेचा महत्त्वाचा भाग आहे. भक्तांसाठी भक्तनिवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहेत.
यासोबतच गरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्याचे उपक्रम श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देतात.
भारतीय परंपरेतील ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही संकल्पना केवळ धार्मिक विधी न राहता प्रत्यक्ष सेवेत उतरते, हे अशा कार्यातून दिसते.
आरोग्यसेवा आणि भाविकांच्या सोयी
मोठ्या संख्येने भाविक येणाऱ्या धार्मिक स्थळी आरोग्यसेवा ही अत्यावश्यक बाब आहे. मोहटादेवी संस्थानाच्या सेवाकार्यात २४ तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सेवा आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था असल्याचे नमूद केले जाते.
तसेच भाविकांच्या दळणवळणासाठी पाथर्डी ते मोहटा अखंड सेवा देणारी वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्याचा उपक्रम भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
वृद्ध, दिव्यांग आणि महिला भाविकांसाठी सोयी, भक्तनिवास, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था आणि लिफ्ट यांसारख्या सुविधांही आहेत.
वनराई आणि धार्मिक पर्यटन
मोहटादेवीचा डोंगराळ परिसर आणि त्यातील वनराई धार्मिक वातावरणाला नैसर्गिक सौंदर्याची जोड देतात. वृक्षलागवड व संगोपनाचा उल्लेखही देवस्थान व विश्वस्त मंडळ सातत्याने राबवित असते.
मंदिराची वास्तुरचना, धार्मिक परंपरा, लोककला, कुस्ती, निसर्ग आणि सेवाकार्य यामुळे मोहटादेवी गडाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या पर्यटन माहितीतही मोहटादेवीचा समावेश आहे.
मंदिरापेक्षा मोठी संकल्पना
मोहटादेवीची खरी ओळख गाभाऱ्यातील मूर्तीत तर आहेच आहे.. यात्रेतील गर्दीत शोधता येणार नाही. ती शोधावी लागते—
वंचित मुलांच्या शिक्षणात,
गरजूंच्या मदतीत,
अन्नदानात,
रुग्णवाहिकेच्या सेवेत,
कीर्तन-प्रवचनातून दर महिन्याला व नवरात्रात होणाऱ्या समाजप्रबोधनात,
कुस्तीच्या आखाड्यात आणि
गडाभोवती जपल्या जाणाऱ्या हिरवाईत.
यामुळे मोहटादेवीची परंपरा ही भक्ती आणि सेवाभाव यांना जोडणारी परंपरा ठरते.देवीसमोर नवस बोलणे ही श्रद्धा; पण त्या श्रद्धेतून एखाद्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावणे, एखाद्या गरजूला आधार देणे किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला आरोग्यसेवा मिळवून देणे—ही त्या श्रद्धेची सामाजिक फलश्रुती आहे.
म्हणूनच मोहटादेवीचा गड दर्शनाचे ठिकाण आहेच;तसेच श्रद्धेने संस्कृती जपणारा आणि सेवेतून समाजाशी नाते जोडणारा गड आहे.गाभाऱ्यातील ज्योत भक्तीची आहे; पण तिचा प्रकाश शिक्षण, संस्कृती, आरोग्य, अन्नदान आणि समाजसेवेपर्यंत पोहोचला, तरच त्या ज्योतीचे खरे सामर्थ्य जाणवते.
नवसाला पावणाऱ्या आईच्या चरणी माथा टेकताना, तिच्या सेवाधर्माची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करणे—हीच मोहटादेवीच्या यात्रेची खरी सांगता ठरावी.
सुखालागीं करिसी तळमळ ।
तरी तूं मोहटा गडा जाय एक वेळ॥१॥
मग तूं अवघाची सुखरूप होसी ।
जन्मोजन्मींचे दुःख विसरसी ॥२॥
चौसष्ट योगिनी घेऊनी सांगात ।
दशमहाविद्या ज्या गडावर वसतात॥३॥
अष्टभैरव उभे घेऊनी पहारा ।
पावन करीती या अवघ्या चराचरा ॥४॥
भक्त म्हणे उपमा काय द्यावी ।
माझ्या मोहटा माते चरणी ओवाळणी करावी॥५॥
डॉ श्रीधर मधुकर देशमुख, पाथर्डी ( माजी विश्वस्त, श्री मोहटादेवी देवस्थान)





