पुणे: पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
दरम्यान, चर्चा रंगली ती विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेची. विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपमध्ये जोरात इनकमिंग सुरु होते. यावेळी मोहिते पाटील भाजपमध्ये जाणार म्हणून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका गुलदस्तात ठेवली होती. मात्र आज “मी राष्ट्रवादीतच” असल्याचे सांगत त्यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, माजी मंत्री मोहिते पाटील यांचा मुलगा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये दाखल झाला होता. काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
यावेळी सहकार तथा अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, राजेश टोपे, कलप्पा आवाडे, इंडियन शुगर इन्सिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.