Indapur : ‘मोहिते-पाटील ब्रँड’ पुन्हा मैदानात
इंदापूर-माळशिरसच्या सीमेवरून वाहणारी जीवनदायिनी नीरा नदी अनेक महिन्यांपासून कोरडी पडली आहे.

इंदापूर : शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला की राजकीय मतभेद बाजूला ठेवून थेट मैदानात उतरण्याची मोहिते-पाटील घराण्याची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील घराण्यातील मान्यवरांनी थेट सराटीच्या रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. उन्हात रस्त्यावर बसून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठबळ देण्याच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला मोठे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाले.
इंदापूर-माळशिरसच्या सीमेवरून वाहणारी जीवनदायिनी नीरा नदी अनेक महिन्यांपासून कोरडी पडली आहे. नदीकाठच्या गावांमधील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या असून, शेतीचे सिंचन, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर वीर-भाटघर साखळी धरणातून नीरा नदीत तातडीने पाणी सोडावे, नदीवरील सर्व बंधाऱ्यांमध्ये दोन ढापे टाकून समप्रमाणात पाणी अडवावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १३) सराटी (ता. इंदापूर) बायपास येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्ष भरत शहा, प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, पंडितराव पाटील, महादेव घाडगे, मनोज जगदाळे, आण्णासाहेब कोकाटे, दत्तात्रय घोगरे, पंजाबराव भगत, प्रतापराव पाटील, नवनाथ रुपनवर, अण्णा पवार, किरण पाटील, रणजीत वाघमोडे, संतोष कोकाटे, राजेंद्र कुरळे, अमर भोसले, रोहित जगदाळे, अनिता खरात, दयानंद गायकवाड यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील शेकडो शेतकरी, महिला आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आभार श्रीमंत ढोले यांनी मानले.
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले नेतृत्व
मोहिते-पाटील घराण्याचा माळशिरस आणि इंदापूर तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव राहिला आहे. सहकार, शेती, पाणी आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांशी या घराण्याचे जुने नाते आहे. याच पार्श्वभूमीवर नीरा नदीच्या पाण्यासाठी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापासून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापर्यंतचे नेतृत्व एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले. सत्तेची पदे किंवा राजकीय प्रतिष्ठेपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत उन्हात आंदोलनात सहभागी होण्याची ही भूमिका राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही निरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
विखे-पाटलांचे बैठकीचे आश्वासन; आंदोलन स्थगित
दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना विखे-पाटील यांनी नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १६) लोकप्रतिनिधी, नीरा नदी कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
राजकीय समीकरणांपलीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न
नीरा नदीच्या पाण्यासाठी झालेल्या या आंदोलनाने केवळ पाणीप्रश्नाला वाचा फोडली नाही, तर इंदापूर-माळशिरसच्या राजकारणातही एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मोहिते-पाटील घराण्याचे ज्येष्ठ नेतृत्व आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील एकत्रित उपस्थिती हा या आंदोलनातील लक्षवेधी राजकीय पैलू ठरला. शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेल्या नेतृत्वाची आठवण शेतकरी कदापि विसरणार नाहीत, अशी भावना या आंदोलनातून व्यक्त होत आहे.





