मोहनलालच्या एमपुराणवर टीकेची झोड; अखेर चित्रपटकर्त्यांनी ते वादग्रस्त सीन्स हटवले

M Puran Movie | वादग्रस्त ठरलेला मल्याळम भाषेतील एल२ – एमपुराण हा चित्रपट काही बदलांनंतर मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बुधवारअखेर ८४ कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमा केला आहे. २००२ मधील गुजरातमधील दंगलीवर हा चित्रपट असल्याचा आरोप उजव्या विचारसणीच्या संघटनांनी केला होता.
त्यांच्याकडून टीका होऊ लागल्याने निर्मात्यांनी स्वतःहून चित्रपटातील काही दृश्ये वगळण्याचा निर्णय घेतला, तर काही दृश्ये संपादित करण्यात आली आहेत. या बदलांना सेन्सॉर बोर्डाने संमती दिल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला. आता चित्रपटात २७ दृष्ये वगळली आहेत, तर १२८ सेकंदाचे फुटेज नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.
हा चित्रपट अभिनेते मोहनलाल यांची पॉलिटिकल फिक्सर म्हणून प्रमुख भूमिका असलेल्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ल्युसिफायर या चित्रपटाचा सीक्वेल आहे. एमपुराणम हा चित्रपट २००२ मधील गुजरातमधील दंगलींवर आधारीत आहे. या दंगलीत १,००० हून अधिक लोकांचे प्राण गेले होते. या दंगलीची सुरवात २७ फेब्रुवारी २००२ मध्ये झाली. अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्यानंतर तेथून परत येणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५९ कारसेवक असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्यात आल्यामुळे त्यांचा जळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रतिक्रिया म्हणून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली होती.
टीकाकारांच्या मते या चित्रपटात हिंदुंनी मुस्लिमांवर कसे हल्ले केले यावर जास्त फोकस ठेवण्यात आला असून गोध्रामधील रेल्वेचा डबा जाळणे आणि हिंदू मरण पावले अशा घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चित्रपटाची सुरुवात १७ मिनिटांच्या झायेद मसूदच्या घटनेसंदर्भातील फ्लॅशबॅकने होते. दंगलींना सुरुवात झालेली आहे आणि झायेदच्या मोठ्या भावाला अज्ञात व्यक्तींनी दंगलीत ठार मारले आहे.
झायेद आणि त्याचे कुटुंबिय तसेच आणखी काही मुस्लिम नागरिक ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत बसून सुरक्षित स्थळी जात आहेत आणि त्याचवेळी मौसी म्हणून दाखवण्यात आलेली एक हिंदू स्त्री या सगळ्यांना तिच्या फार्महाऊसवर आश्रय देते. लवकरच त्याठिकाणी बलराजच्या नेतृत्वात दंगलखोरांचे टोळके तलवारी आणि शस्त्रे घेऊन येते. फार्महाऊसवरील मौसीसह सगळ्यांची हत्या करण्यात येते. झायेदला त्याच्या वडिलांनी वैरणीच्या गंजीत लपवून ठेवले असल्याने तो फक्त वाचतो.
या चित्रपटात करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे –
अनेक दृश्यांमध्ये बाबा बजरंगी या पात्राचा उल्लेख होता. आता त्या पात्राचा उल्लेख बलराज ऐवजी बलदेव असा करण्यात आला आहे.
सुरुवातीला पडद्यावर फ्लॅशबॅकची सुरवात करताना २००२- इंडिया अशी अक्षरे होती. आता त्याऐवजी ए फ्यु इयर्स अगो अशी अक्षरे वाचायला मिळतील.
दुकानमालक पळून गेले आणि त्याठिकाणच्या मालाच्या चोऱ्या होत असल्याची दृश्ये वगळण्यात आली.
काही दृश्यांमध्ये धार्मिक ठिकाणांच्या (मंदिर) पार्श्वभूमीवर मोटारी आणि दंगेखोर जात असल्याची दृश्ये वगळण्यात आली आहेत.
प्रारंभीच्या कृतज्ञता निर्देशनामध्ये अभिनेते आणि भाजपचे खासदार सुरेश गोपी आणि महसूल अधिकारी ज्योतिस मोहन यांना धन्यवाद देणाऱ्या पाट्या होत्या. आता त्या वगळण्यात आल्या आहेत.
दंगलींच्या दृश्यांमध्ये महिलांवर हल्ले करण्यात येत असल्याची दृश्ये वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये २९ सेकंदांचे एक दीर्घ दृश्यही आहे.
जेव्हा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा (एनआयए) उल्लेख येतो तेव्हा आवाज बंद करण्यात आलेला आहे.





