Mohan Charan Majhi : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची मोठी घोषणा; म्हणाले…
ओडिशात पुढील तीन वर्षे नवीन मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी करताना राज्यातून अंमली पदार्थांचे व्यसन पूर्णपणे नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Mohan Charan Majhi : ओडिशात पुढील तीन वर्षे नवीन मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी करताना राज्यातून अंमली पदार्थांचे व्यसन पूर्णपणे नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भुवनेश्वरमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या जीवन जिंदाबाद-२.० या जनजागृती कार्यक्रमात बोलताना माझी यांनी अंमली पदार्थांविरोधातील सरकारचे झिरो टॉलरन्स धोरण स्पष्ट केले. अंमली पदार्थांचे व्यसन संबंधित व्यक्तीबरोबरच त्याच्या कुटुंबाचे आणि समाजाचेही नुकसान करते, असे त्यांनी बोलताना सांगितले. अंमली पदार्थांचे व्यसन अनेक गंभीर गुन्हे आणि महिलांविरोधातील अत्याचारांमागील प्रमुख कारण ठरत असल्याचे मुख्यमंत्री (Mohan Charan Majhi) म्हणाले.
मद्यपानामुळे दरवर्षी २.६० लाख ते २.८० लाख लोकांचा मृत्यू होतो, असा दावाही त्यांनी केला. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत ओडिशा देशात दुसऱ्या क्रमांकावर असणे चिंताजनक असल्याचे त्यांनी मूद केले. राज्य पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला मद्याबरोबरच गांजा, अफू आणि सिंथेटिक ड्रग्जविरोधातही कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच ड्रग-फ्री इंडिया उपक्रमासाठी समर्पित संकेतस्थळाचे उद्घाटन त्यांनी केले.
अवैध मद्यव्यवहार आणि भेसळयुक्त मद्यविक्री रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता बाळगावी, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात तंबाखू, निकोटिनयुक्त पान मसाला आणि गुटख्याच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरांना अंमली पदार्थमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा ठिकाणी विशेष देखरेख आणि जनजागृती उपक्रम राबवले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी (Mohan Charan Majhi) सांगितले.






