भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मोदींसह मोहन भागवतही

नवी दिल्ली: अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उभारलेल्या व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच आगस्ट रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचतील. तेथे ते सुमारे तीन तास थांबतील. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते नवी दिल्लीला प्रयाण करतील.
अयोध्येत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान हनुमानगढीला भेट देतील. त्यानंतर ते भूमिपूजन स्थळाला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी होतील, असे सूत्रांनी सांगितले.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पंतप्रधानांसह पाच व्यक्ती असतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि राममंदिर न्यासाचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दासजी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात येणार आहे.
दरम्यान भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी वेगात सुरू असून उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांनी भूमीपूजन स्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.





