Mohammed Shami : मोहम्मद शमीने वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अवघ्या ३५ धावांवर पाच विकेट तंबूत होते. पण सहाव्या विकेटसाठी तोहिद हृदोय आणि जाकेर अली यांनी १५४ धावांची भागीदारी केली संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. बांगलादेशने ४९. ४ ओव्हरमध्ये २२८ धावा केल्या.
मोहम्मद शमीने केला ‘हा’ विक्रम
या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केली. पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट घेतल्या. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेत एक विक्रम आपल्या नावावर केला. तिसऱ्या विकेटसह मोहम्मद शमीने २०० विकेटचा पल्ला गाठला आहे. मोहम्मद शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.या सामन्यात शामीने १० ओव्हरमध्ये ५३ धावांच्या बदल्यात ५ विकेट्स घेतल्या.
मोहम्मद शमीने ५१२६ चेंडूत २०० विकेटचा पल्ला गाठला आहे. यासह कमी चेंडूत २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मिचेल स्टार्कने ५२४० चेंडूत, सकलेन मुश्ताकने ५४५१ चेंडूत, ब्रेट लीने ५६४०, ट्रेंट बोल्टने ५७८३ चेंडूत, तर वकार युनिसने ५८८३ चेंडूत हा पल्ला गाठला आहे. मिचेल स्टार्कने १०२ वनडे सामन्यात २०० विकेट घेण्याची किमया साधली होती. मोहम्मद शमी आणि सकलेन मुश्ताकने १०४ सामन्यात, ट्रेंट बोल्टने १०७ सामन्यात, ब्रेट लीने ११२ सामन्यात आणि एलन डोनाल्डने ११७ सामन्यात ही कामगिरी केली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.





