Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलटफेर ! मोहम्मद रिझवानची कर्णधारपदावरुन हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून मोहम्मद रिझवान याची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. त्याच्या जागी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. आयसीसीने सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली.
इस्लामाबाद येथे पीसीबीच्या निवड समिती आणि एकदिवसीय तसेच टी-20 कोच माईक हेसन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, रिझवानला कर्णधारपदावरून हटवण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पीसीबीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, तसेच रिझवाननेही यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
रिझवानची कर्णधारपदावरून हकालपट्टी
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या बैठकीत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. मात्र, कोणत्याही एका व्यक्तीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. रिझवानला कर्णधारपदावरून का हटवण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शाहिन आफ्रिदीची दुसऱ्यांदा कर्णधारपदी निवड
शाहिन आफ्रिदीला यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानला पाच सामन्यांच्या मालिकेत 1-4 अशा मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे शाहिन एकदिवसीय कर्णधार म्हणून किती यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
रिझवानची कर्णधार म्हणून कामगिरी
मोहम्मद रिझवानने एकूण 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने 9 सामने जिंकले, तर 11 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून रिझवानने 41.67 च्या सरासरीने 625 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवले होते.
शाहिनची नवी इनिंग
शाहिन आफ्रिदी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून, पाकिस्तान 1-0 ने आघाडीवर आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून, 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.
या मालिकेतून शाहिन एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील या अनपेक्षित बदलामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहिन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ कशी कामगिरी करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





