Mohammad Rizwan : रिझवानचा फ्लॉप शो कायम! स्वीप शॉट मारायला गेला अन् करुन घेतली फजिती, पाहा VIDEO

Mohammad Rizwan Dismissal Viral : पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानला आशिया चषक 2025 च्या संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय, त्याला टी-20 संघातूनही वगळण्यात आले असून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्येही त्याची घसरण झाली आहे. आशिया चषकातून वगळल्यानंतर रिझवानने वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. तो सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाचा भाग आहे. गुरुवारी त्याच्या संघाचा सामना बारबाडोस रॉयल्सविरुद्ध झाला. या सामन्यातील मोहम्मद रिझवानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मोहम्मद रिझवान ३ धावांवर झाला बाद –
सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. मात्र, तो केवळ 6 चेंडू खेळू शकला आणि अवघ्या 3 धावांवर बाद झाला. जोमेल वारिकनच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्याचा शॉट हुकला आणि तो क्लीन बोल्ड झाला. यादरम्यान रिझवानचा तोल गेला आणि तो मैदानावर पडला. त्याच्या या विचित्र पद्धतीने बाद होण्याने मैदानावरील खेळाडूंसह विरोधी संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही हशा पिकला.
रिझवानचा व्हिडीओ व्हायरल –
— mediaa 🗂️ (@archive_PCT) August 21, 2025
मोहम्मद रिझवानने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, ज्यामध्ये तो कर्णधार होता. मात्र, त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि संघातूनही वगळण्यात आले. आशिया चषक 2025 मध्ये पाकिस्तानचा संघ सलमान आघाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : बांगलादेशचा आशिया कपसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ खेळाडू तीन वर्षांनी परतला
सेंट किट्स संघाचा 12 धावांनी विजय –
मोहम्मद रिझवान अपयशी ठरला असला, तरी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने हा सामना 12 धावांनी जिंकला. संघाचे नेतृत्व जेसन होल्डर करत आहे. प्रथम फलंदाजी करताना संघाने 8 बाद 174 धावा केल्या होत्या. कायल मेयर्सने 28 चेंडूत 42, तर जेसन होल्डरने 21 चेंडूत 38 धावांची खेळी केली. रॅमन सिमंड्सने 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोवमॅन पॉवेलच्या नेतृत्वाखालील बारबाडोस रॉयल्स 162 धावांवर सर्वबाद झाला. कदीम एलेनने 28 चेंडूत 42 धावा केल्या, परंतु मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत, ज्यामुळे संघाला पराभव पत्करावा लागला. कर्णधार होल्डरने केवळ 14 धावांत 4 विकेट्स घेत सामन्यात आपली छाप सोडली.





