Mohammad Azharuddin : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन यांना मोठा दिलासा ! राज्यपालांकडून आमदार म्हणून नियुक्तीला मंजुरी
कॉंग्रेसशासित तेलंगणात मंत्रिपद सांभाळत असणारे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांना मोठा दिलासा मिळाला.

Mohammad Azharuddin : कॉंग्रेसशासित तेलंगणात मंत्रिपद सांभाळत असणारे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांना मोठा दिलासा मिळाला.
राज्यपालांच्या कोट्यातून त्यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. आमदार म्हणून त्या नियुक्तीला अखेर राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांनी मंजुरी दिली.
राजकारणात सक्रिय झालेले अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) प्रदीर्घ काळपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या उद्देशातून त्यांना तेलंगणा विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य बनवण्यात आले. कॉंग्रेस सरकारने ती नियुक्ती मागील वर्षीच्या ऑगस्टमध्ये केली. त्यापाठोपाठ त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.
मंत्री म्हणून त्यांनी मागील वर्षीच्या ३१ ऑक्टोबरला पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, राज्यपालांनी तातडीने अझरूद्दीन यांच्या आमदार म्हणून नियुक्तीला मान्यता न दिल्याने पेच आणि सस्पेन्स निर्माण झाला. मंत्री बनल्यानंतर सहा महिन्यांत आमदार म्हणून वर्णी लागणे अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांच्यासाठी अनिवार्य होते. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत त्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब करणे गरजेचे बनले होते.
अझरूद्दीन यांच्या नियुक्तीचा सस्पेन्स लांबल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ए.रेवंथ रेड्डी यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी रेड्डी यांनी नियुक्तीला मंजुरी देण्याची विनंती केल्याचे समजते. आता ती मंजुरी मिळाल्याने अझरूद्दीन यांच्या प्रमाणेच तेलंगणा सरकार आणि कॉंग्रेसचाही जीव भांड्यात पडला आहे.






