कोलंबो : मालदीवचे अध्यक्ष मुहम्मद मुइझ्झू यांनी तब्बल १५ तास एका पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे. त्यांच्या कार्यालयाकडून या संदर्भातील वृत्त देण्यात आले आहे. मुइझ्झू यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला. यापुर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी १४ तास चाललेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. त्यांनी बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांच्या ७ तासांच्या पत्रकार परिषदेचा विक्रम मोडला होता. मुइझ्झू यांच्या पत्रकार परिषदेला भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल १४ तास ५४ मिनिटे ही पत्रकार परिषद सुरू होती. या कालावधीमध्ये प्रार्थनेसाठी अल्पकाळ हा वार्तालाप थांबला होता. प्रार्थनेनंतर पुन्हा पत्रकार परिषद सुरू राहिली. मध्यरा६नंतर ही पत्रकार परिषद समाप्त झाली. जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ही दीर्घकाळ चाललेली पत्रकार परिषद झाली, हा एक योगायोग होता. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या दोन डझन वार्ताहरांना त्यांच्या जागेवरच जेवण उपलब्ध केले गेले. मुइझ्झू यांच्या आगोदरचे अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी २००९ मध्ये समुद्रतळाशी पत्रकार परिषद घेऊन एक आगळा विक्रम केला होता. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा उपक्रम केला होता.