विरोधातील 15 नेत्यांचा नायनाट करण्याची मोदींची सूचना; सिसोदियांचा थेट आरोप

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नावांची यादी दिल्ली पोलिस, सीबीआय आणि ईडीकडे पाठवली असून या यादीतील व्यक्तींवर छापे घालून किंवा त्यांच्यावर खोटे खटले दाखल करून त्यांचा नायनाट करण्याची सुचना त्यांना करण्यात आली आहे.
या पंधरा व्यक्तींच्या यादीतील बहुतेक नावे ही आम आदमी पक्षाशी संबंधीत आहेत असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. पुढील निवडणुकीपुर्वी या यादीतील 15 जणांचे आयुष्य बरबाद करण्याची ही योजना आहे.
खात्रीशीर स्त्रोतातून आम्हाला ही माहिती मिळाली आहे असा दावा सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश आस्थाना यांच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली असून आस्थाना यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची ग्वाही सरकारला दिली असल्याचेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.
राकेश आस्थाना हे मोदींचे ब्रम्हास्त्र आहे अशी टिप्पणीही सिसोदिया यांनी केली आहे. ते म्हणाले की आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा केंद्र सरकारचा हा डाव असला तरी आम्ही प्रामाणिकपणे आणि सत्याने राजकारण करीत आहोत. त्यामुळे सीबीआय आणि ईडीचे आम्ही स्वागतच करू असेही त्यांनी म्हटले आहे.





