Satara: माँडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली! सातारा व कराडमध्ये वाहतूक पोलिसांची एकाचवेळी ६७७ वाहनांवर कारवाई
Satara सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधून ही विशेष मोहीम राबविली.

Satara: मॉडिफाय सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य प्रेशर हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेट या वाहतूक नियमांना केराची टोपली दाखविणाऱ्या वाहन चालकांविरोधात सातारा पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा आणि कराडमध्ये एकाचवेळी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ६७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर अखेर बुलडोझरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.
सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधून ही विशेष मोहीम राबविली. कराड येथील विद्यानगर परिसरात जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली टाकून त्यांचा अक्षरशः चुराडा करण्यात आला. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर नष्ट करण्यात आले. मॉडिफाय सायलेन्सरच्या माध्यमातून रस्त्यावर प्रचंड आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट, प्रेशर हॉर्न आणि नियमबाह्य सायरन वापरणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सातारा उपअधीक्षक विपुल पाटील, कराड उपअधीक्षक राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे आणि सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी कारवाईचे नियोजन केले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंड करून सोडून न देता जप्त केलेली नियमबाह्य उपकरणेच नष्ट करण्याचा इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मॉडिफाय सायलेन्सर, प्रेशर हॉर्न, सायरन अथवा फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.यापुढेही अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कारवाईचा ‘आकडा’ बोलतोय!
मॉडिफाय सायलेन्सर २८१
फॅन्सी नंबर प्लेट १७०
प्रेशर हॉर्न १८३
सायरन ४३
एकूण ६७७ प्रकरणांवर कारवाई





