‘फेरफार’ : प्रभाग क्र.2; टिंगरेनगर-संजयपार्क

(डॉ. राजू गुरव/प्रकाश बिराजदार) – नव्या प्रभाग रचनेत नागपूर चाळ-फुलेनगर या प्रभागाचे नाव बदलून ते टिंगरेनगर-संजयपार्क असे करण्यात आले आहे. पूर्वीच्या प्रभागातील निम्यापेक्षा अधिक भाग तोडून तो दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे. या प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदारही या प्रभागातील नगरसेवक आहेत. भाजपाच्या वर्चस्वाला धक्का देवून या प्रभागातील सर्व जागा जिंकण्यासाठी विद्यमान आमदारांपुढे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. राष्ट्रवादी व भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना तुल्यबळ उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे.
प्रभागातील समाविष्ट भाग
येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा जेल प्रेस व कॉलनी, कस्तुरबा हौसिंग सोसायटी पार्ट, कुमार समृध्दी, सिध्देश्वनगर हौसिंग सोसायटी, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, विद्यानगर, इंदिरानगर, कलवडवस्ती पार्ट, खांदवेनगर पार्ट, खेसे पार्क पार्ट, केंद्रीय विद्यालन नं.2, मुंजाबावस्ती पार्ट, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, रोहन मिथिला, म्हाडा कॉलनी, सिंबायोसिस विधी विद्यालय, कॅमलोट सोसायटी, कोणार्क कॅम्पस, लुंकड क्विन्सलॅंड, गंगा नेब्युला सोसायटी, मिस्टिक मुड्स सोसायटी, विमाननगर पार्ट, गंगापूरम सोसायटी, साकोरे नगर, देवकरवस्ती, डी.एन.के क्वेअर, सत्यम आर्केड, नगररोड क्षेत्रीय कार्यालय, जीवनज्योती हॉस्पिटल, पुरु सोसायटी, संजय पार्क आदी भागाचा नव्या प्रभाग रचनेत समावेश झाला.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
प्रभागातील सहा उद्यानांचे सुशोभीकरण केले व ओपन जिमच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. समाज मंदिरे, दोन प्रशस्त क्रीडांगण, महिला सबलीकरणासाठी केंद्र, लाइट हाऊस प्रकल्प उभारण्यात आला. “जीपीएस’ मॅपिंगचा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेणार आहे. आमदार टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर ते लोहगाव विमानतळ या डीपी रस्त्याचे अग्रसेन शाळेजवळील रखडलेले काम मार्गी लागले. महाराष्ट्र हौसिंग बोर्डात 30 लाख लिटर पाण्याची टाकी उभारली. महाराष्ट्र हौसिंग बोर्डातील 110 इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे (भाजप)
माजी महापौर भारत सावंत पाम उद्यान आठ एकर जागेत उभारण्यात आले. हरीगंगा सोसायटी येथे पाण्याची टाकी उभारली. शांतीनगर येथे अण्णाभाऊ साठे समाज मंदिर उभारण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता रुंदीकरणात गेलेल्या
दत्त मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. शितल सावंत (भाजप)
संत ज्ञानेश्वर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल उभारण्यात येत असून यामाध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण मिळणार आहे. उर्दू ई-लर्निंग शाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. शाळांमध्ये संविधान शिल्प तर मेंटल कॉर्नर येथे पालखी शिल्प उभारले आहे.फरजाना शेख (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
संपूर्ण प्रभागात लोकप्रतिनिधी पोहचलेच नाहीत. केवळ विकासकामांची भूमिपूजने केली. प्रत्यक्षात मात्र ती कामे झालीच नाहीत. श्रेय लाटण्याचे काम केले. निवडणूकीत मते मागायला सर्वांकडे गेले. निवडून आल्यावर प्रभागाच्या सीमा निश्चित करून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. सुभाष चव्हाण (भाजप)
लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित असतानाही प्रभागाचा काहीच विकास झालेला नाही. लोकप्रतिनिधी फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत. सर्वांनी प्रभागातील हद्दी ठरवत कामे करताना सतत जबाबदारी झटकली. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. सुनिल गोगले (राष्ट्रवादी)
प्रभागाच्या विकासासाठी नियोजनच झाले नाही. रस्ते कॉंक्रीटीकरण करण्यापूर्वीच ड्रेनेजलाइन, विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या टाकण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. महापालिकेत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्याने निधी मिळाला असला तरी तो नियोजनपूर्वक खर्च केला गेलेला नाही. उज्वला नलावडे (राष्ट्रवादी)
प्रभागात नवीन कामे शून्य झाली आहेत. जून्याच कामांना डागडूजी करण्यात आली. शाळा, क्रीडांगण यासारखे कोणतेच मोठे प्रकल्प उभारण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतल्याचे पहायला मिळाले नाही. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य हे मूलभूत प्रश्नही कायमच आहेत. सुरेखा जाधव (अपक्ष)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
राष्ट्रवादी कॉंग्रेस : सुहास टिंगरे, रेणूका चलवादी, विनोद पवार, विश्वास खांदवे, सुरेखा खांदवे, सोहनसिंग सोना. भाजप : अनिल टिंगरे, राहूल भंडारे, मुक्ता जगताप, ऍड. अय्युब शेख, विशाल टिंगरे, शामा जाधव, चंद्रकांत जंजिरे, विजय चौगुले. शिवसेना : सागर माळकर. कॉंग्रेस : राजेंद्र शिरसाट, अल्तमश मोमीन, राहुल लव्हे. बसपा : हुलगेश चलवादी. मनसे : शाम ताठे. एमआयएम : शब्बीर शेख.


