‘४ जुनला मोदी सत्तेच्या बाहेर गेलेले असतील’; लालूप्रसाद यांना विश्वास

पाटणा – येत्या ४ जुनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल त्यावेळी मोदी सत्तेच्या बाहेर गेलेले असतील आणि इंडिया आघाडीचे सरकार देशात स्थापन झालेले असेल असा विश्वास राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे.
आपल्याला देवानेच एका उद्देशाने पृथ्वीवर पाठवले आहे असे जे विधान मेादींनी एका मुलाखतीत केले आहे, त्याचीही लालूंनी खिल्ली उडवली. मोदी म्हणत आहेत की ते जैविक अपत्य नाहीत,तर ते ‘अवतार’ आहेत.
पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची आई जिवंत असेपर्यंत त्यांना वाटत होते की कदाचित त्यांचा जन्म जैविक होता आणि आईच्या निधनानंतर जेव्हा ते विविध अनुभव लक्षात घेतात तेव्हा त्यांना खात्री वाटते की आपल्याला देवानेच आपल्याला पाठवले आहे.
या अवतारी पुरूषाने देशात कायकाय घोळ घातला आहे ते लोकांच्या समोर आहे असेही लालूंनी म्हटले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक होत आहे.
या राज्यात सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ४० पैकी ३९ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती.





