माझा मुलगा ‘मोदी-शहां’चा सेवक – गोळीबार करणाऱ्या तरुणाच्या वडिलांचा दावा

नवी दिल्ली – दिल्लीतील शाहीन बाग परिसरामधील गोळीबाराच्या घटनेस आज एक नवं वळण मिळालं आहे. गोळीबार करणारा कपिल नामक युवक आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर आज कपिलच्या वडिलांनी, ‘आमचा आम आदमी पक्षाशी कोणताही संबंध नसून माझा मुलगा कपिल, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा सेवक आहे.’ असा दावा केला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना कपिलचे वडील गजे सिंग यांनी ही माहिती दिली. ‘कपिलवर हिंदुत्ववादी विचारांचा पगडा असून शाहीन बागेमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने कपिलने गोळीबाराचे कृत्य केलं असावं’ असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला.
काय आहे शाहीन बागेतील गोळीबार प्रकरण?
दिल्लीतील शाहीन बाग परिसरामध्ये १ फेब्रुवारी रोजी कपिल गुज्जर नामक एका युवकाने गोळीबार केला होता. या घटनेनंतर शाहीन बाग परिसरात तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं होतं. दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरु असून येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतानाच व्हिडीओ देखील चित्रित केला होता.
या चित्रफितीमध्ये सदर युवक, ‘हिंदुस्तानामध्ये हे सर्व चालणार नाही, इथं केवळ हिंदूंचेच चालेल’ अशा आशयाच्या घोषणा देताना दिसत असल्याने सदर युवक हिंदू संघटनांशी संलग्न असेल असा कयास बांधला गेला मात्र दिल्ली पोलिसांचे तपास चक्र फिरल्यानंतर सदर युवकाचे धागेदोरे आम आदमी पक्षाशी जुळले असल्याची प्राथमिक माहिती काल समोर आली होती.
युवक आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता : दिल्ली पोलिसांचा दावा
याबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश देव यांनी माहिती देताना सांगितले होते की, “शाहीन बागेत गोळीबार केलेला युवक कपिल याचा मोबाईल तपासल्यानंतर त्याने आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्याची काही छायाचित्र सापडली आहेत. तसेच चौकशीदरम्यान कपिल याने, वर्षभरापूर्वी वडिलांसह आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्याचे कबूल केले आहे.”
आम आदमी पक्षाचा भाजपवर ‘थेट’ आरोप
यानंतर ‘आप’तर्फे दिल्ली पोलिसांच्या दाव्यामागे भाजपचा रडीचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतील याची प्रचिती आल्यानेच गृहमंत्री अमित शहा दिल्ली पोलिसांना हाताशी धरून अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत’ असा थेट आरोप केला होता.
कपिलच्या गुज्जर याच्या वडिलांच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण
दरम्यान आता कपिल गुज्जर या गोळीबार केलेल्या तरुणांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबीयांचा अथवा कपिलचा आम आदमी पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याने या घटनेस नवीन वळण मिळाले आहे.
https://twitter.com/SaniaAhmad1111/status/1225020375680991235?s=08





