Narendra Modi : लठ्ठपणाविरोधात मोदींनी हाती घेतली मोहीम; जनजागृतीसाठी केली 10 मान्यवरांची नियुक्ती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्यांनी सोमवारी विविध क्षेत्रांतील १० मान्यवरांची नियुक्ती केली. मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमात लठ्ठपणा या आव्हानाविरोधात लढण्याविषयी भाष्य केले. त्यांनी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याची गरज अधोरेखित केली.
लठ्ठपणामुळे विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचा विचार करून मोदींनी संबंधित मोहिमेसाठी पुढाकार घेतला. ती मोहीम पुढे नेण्यासाठी जनजागृती केली जाईल. त्याची जबाबदारी मोदींनी मान्यवरांवर सोपवली. त्यामध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यंमत्री उमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी, खासदार-समाजसेविका सुधा मुर्ती, गायिका श्रेया घोषाल, मोहनलाल, आर.माधवन आणि निरहुआ हे अभिनेते तसेच मनू भाकर आणि मीराबाई चानू या ऑलिम्पिकपटूंचा समावेश आहे.
मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी संबंधित मान्यवरांनी प्रत्येकी १० जणांची नियुक्ती करावी, असे आवाहन मोदींनी केले. लठ्ठपणाविरोधातील मोहिमेचा फोकस प्रामुख्याने खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या आवाहनावर असेल.





