बेरोजगारीचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल; 10 लाख जणांना मिळणार सरकारी नोकरी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 ऑक्टोबरला रोजगार मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे 10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहिमेचा प्रारंभ होईल. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 75 हजार नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्या सोहळ्याच्या दिवशीच नियुक्तीपत्रे दिली जातील. देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करतात. तो मुद्दा निष्प्रभ ठरवण्यासाठी सरकारने आता पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
मोदींनी याआधीच रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडवर कार्य करण्याचे आदेश सर्व केंद्रीय मंत्रालयांना आणि विभागांना दिले. आता त्या दिशेने पडलेले महत्वाचे पाऊल म्हणून रोजगार मेळ्याकडे पाहिले जात आहे. त्या मेळ्याचे उद्घाटन मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील. देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी केंद्र सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये रूजू होतील. ते अ आणि ब श्रेणी (राजपत्रित), ब श्रेणी (अ-राजपत्रित) तसेच क श्रेणीतील कर्मचारी आहेत.
केंद्रीय सशस्त्र दल कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्वीय सचिव, स्टेनो, प्राप्तिकर निरीक्षक आदी पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. पुढील लोकसभा निवडणुका अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना बेरोजगारीचा मुद्दा तापवण्याची अधिक संधी मिळू नये यादृष्टीने मोदी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.





