नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी (मनरेगा) संबंधित योजनेला नवे नाव मिळणार आहे. त्या योजनेचे नामकरण पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे केले जाणार आहे. त्याविषयीच्या विधेयकाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मनरेगा योजनेंतर्गत देशाच्या ग्रामीण भागांत आर्थिक वर्षातील किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली. आता कामाचे दिवस वाढवून १२५ इतके केले जाणार आहेत. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना मनरेगा अस्तित्वात आला. ग्रामीण भागांतील कुटूंबांना उपजीविकेची सुरक्षा देण्याच्या उद्देशातून ते महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक कुटूंबातील प्रौढ सदस्यांना स्वेच्छेने अकुशल स्वरूपाचे काम करण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, ती योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला. संबंधित आरोप, टीका निष्प्रभ ठरवण्यासाठी आता सरकारने महत्वाची कृती केल्याचे मानले जात आहे.