BJPvsNCP : मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप

मुंबई – मोदी सरकार (Modi Govt) हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आल्यानंतर रोजंदारी करणाऱ्यांसाठी व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्व्हे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले, शिवाय कोरोना काळात अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकर्यांना मुकावे लागले होते. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकारने ते भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले, असेही महेश तपासे म्हणाले.





