Modi Government : शशी थरूर ते सुप्रिया सुळेंपर्यंत; मोदी सरकारने विरोधी खासदारांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भारत जगभरात पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची योजना आखत असून त्यासाठी मोदी सरकारने एक रणनीती आखली आहे. यामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनाच नाही तर विरोधी पक्षांच्या खासदारांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या यादीत काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश करण्यात आला आहे. थरूर आणि ओवैसी हे मोदी सरकारचे विरोधक आहेत, तरीही त्यांना प्रतिनिधीमंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे मोठी चर्चा होते आहे. विशेष म्हणजे थरूर यांच्या समावेशाबाबत कॉंग्रेस नाराज असल्याचे स्पष्ट दिसते आहे. तथापि, मोदी सरकारने काही कारणांमुळेच थरूर यांच्यावर विश्वास टाकला असल्याचेही म्हटले जाते आहे.
पंतप्रधान मोदी अनेकदा त्यांच्या निर्णयांनी लोकांना आश्चर्यचकित करतात. यावेळीही त्यांनी असेच काहीसे केले. शशी थरूर यांना बहुपक्षीय शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये दीर्घ अनुभव असलेले थरूर हे कूटनितीमध्येही उत्तम तज्ज्ञ आहेत. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघड करण्यात थरूर यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. २००६ मध्ये कोफी अन्नान यांच्यानंतर थरूर हे संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदाच्या शर्यतीत होते, परंतु ते महासचिव होऊ शकले नाहीत.
शशी थरूर यांना वेगवेगळ्या देशांचे स्वरूप माहित आहे आणि त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे हे चांगले माहिती आहे. अनेक प्रसंगी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. शशी थरूर सुरुवातीपासूनच ऑपरेशन सिंदूरचे समर्थक आहेत आणि आता मोदी सरकारने त्यांना शिष्टमंडळात समाविष्ट केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर थरूर यांनी विविध माध्यमांवर भारताची बाजू जगासमोर मांडली आहे.
देशासाठी आम्ही सगळे एकत्र- सुळे
काल मला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा फोन आला आणि त्यांनी मला समितीचा भाग होण्यास सांगितले. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्ही इतर देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडू असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या. प्रत्येक समितीमध्ये ५ सदस्य असतील, जे पुढील १० दिवसांत ५ ते ८ देशांना भेट देतील. हा दौरा २३-२४ मे रोजी सुरू होईल.
‘हे’ नेते परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार
शशि थरूर (काँग्रेस) – यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
विजयंत जय पांडा ( भाजप) – ईस्टर्न यूरोप
कनिमोझी (द्रविड मुन्नेत्र कळघम) – रूस
संजय झा (जनता दल ) – साउथ ईस्ट आशिया
रविशंकर प्रसाद (भाजप) – मिडल ईस्ट
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ) – पश्चिम आशिया
श्रीकांत शिंदे (शिवसेना ) – आफ्रिकन देश
परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात सुमारे 43/45 खासदारांची नावे समाविष्ट केली जातील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, खालील खासदारांची नावे त्यात समाविष्ट आहेत.
प्रेमचंद गुप्ता, आरजेडी
संजय झा, जेडीयू- जपानला जाणार
रविशंकर प्रसाद, बीजेपी- मिडिलईस्ट येथे जाणार
विजयंत जय पांडा- भाजप
अनुराग ठाकुर – भाजप
बृजलाल, भाजप
तेजस्वी सूर्या, भाजप
अपराजिता सारंगी, भाजप
राजीव प्रताप रूडी, भाजप
डी पुरंदेश्वरी – भाजप
श्रीकांत शिंदे – शिवसेना शिंदे
सुप्रिया सुळे – एनसीपी (शरद पवार)
सस्मित पात्रा – (बीजेडी)
समिक भट्टाचार्य- (भाजप)
मनीष तिवारी – (कांग्रेस)
शशि थरूर – कांग्रेस
अमर सिंह- कांग्रेस
प्रियंका चतुर्वेदी – शिवसेना उद्धव ठाकरे गट
जॉन बिट्स- सीपीआयएम
असदुद्दीन ओवैसी- AIMIM





