9 वर्षात पीएम मोदी हिंदुह्रदयसम्राट कसे बनले? किती मंदिरांचे केले पुनरुज्जीवन?

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या संपूर्ण काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक अनोखी क्रांती घडवून आणली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच स्वतःला अभिमानाने हिंदू राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पंतप्रधानांनी भारतातील प्राचीन मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी देखील कठोर परिश्रम घेतले आहेत. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीपासून ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरपर्यंत मोदी सरकारने या 9 वर्षांत अनेक मोठी पाऊले उचलत हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे.
1. काशी विश्वनाथ –
‘काशी’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. 2019 मध्ये मोदी सरकारने काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 मोठ्या इमारती आणि छोट्या जमिनी संपादीत केल्या आहे. तसेच 2021 मध्ये, नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या मध्यभागी असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्यामुळे ‘काशी’ या प्राचीन शहराच्या पर्यटनाला एक मोठी चालना मिळाली आहे.
2. सोमनाथ मंदिर –
सोमनाथ मंदिर हे प्राचीन संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. याच मंदिराची मोहम्मद गझनीने लूट केली होती. त्यामुळे अनेक वेळा या मंदिराची पुनर्बांधणीही करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटनास चालना देण्याचे काम केले आहे. तसेच नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. श्री सोमनाथ ट्रस्ट हे एक धार्मिक ट्रस्ट असून ते मंदिर परिसराचे व्यवस्थापन आणि देखभाल करण्याचे काम करते.
3. केदारनाथ मंदिर-
2013 मध्ये उत्तराखंड राज्यात आलेल्या विनाशकारी महापुराने संपूर्ण केदारनाथमध्ये हाहाकार माजवला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर लगेच केदारनाथ मंदिराच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. नरेंद्र मोदी हे कायमच केदारनाथच्या दर्शनाला जात असतात. ‘केदारनाथला गेल्यावर मला अध्यात्मिक शांती मिळते’ असे पंतप्रधानांनी अनेकदा सांगितले आहे.
4. अयोध्येतील राम मंदिर –
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत म्हणून प्रभू श्रीरामचंद्राची ओळख आहे. याच राम मंदिराच्या अनेक कायदेशीर आणि राजकीय लढ्यांना सामोरे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली आहे. अयोध्येतील हे राम मंदिर हे देशातील सर्वात मोठे मंदिर असणार असून त्यातून देशाच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
5. चारधाम प्रकल्प –
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने चार धाम प्रकल्प सुरू केला असून यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र शहरांना एकत्रित पणे जोडण्याचे काम करणार आहे. या प्रकल्पात 900 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे स्वत: व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकल्पाचे निरीक्षण करत असतात तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे रिअल-टाइम लाइव्ह अपडेट्स देखील घेत असतात.
6. परदेशातील मंदिरे –
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीदरम्यान त्यांनी एका हिंदू मंदिराची पायाभरणी केली. तसेच 2019 मध्ये बहरीनमधील मनामा येथील 200 वर्ष जुन्या श्रीनाथजी मंदिराच्या नूतनीकरणासाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी डॉलर्सचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.





