मुंबई : नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे शुक्रवारी सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून भीषण अपघात झाला. या अपघातात ८ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील सर्व महिला मजूर या हिंगोलीतील गुंज तालुक्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल कळाल्यानंतर दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील पिडीतांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेतीकामासाठी जात होत्या. विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.