पुणे | वारजे माळवाडीतील पटेकर टोळीवर मोक्का

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना विट मारुन जखमी केले. तसेच त्याठिकाणी जमलेल्या लोकांना शिवागाळ करुन हत्यारे उगारुन दहशत निर्माण करणाऱ्या गणेश उर्फ गुड्या अनिल पटेकर व त्याच्या इतर सहा साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. चालू वर्षातील ही मोक्काची १६वी कारवाई आहे.
याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात अमरजित मुन्ना सिंग (वय २३), रोहन अनिल चव्हाण (वय २५), शुमवेल उर्फ दाद्या बाबुराव गायकवाड (वय ३० तिघे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना अटक केली आहे. तर, टोळी प्रमूख गणेश उर्फ गुड्या अनिल पटेकर याच्यासह इतर चार जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
टोळी प्रमुख गणेश पटेकर याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन अपराध केले आहेत. आरोपींनी खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, अपहरण, जबरी चोरी, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करेण असे गंभीर गुन्हे केले आहेत.
पटेकर टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज शेडगे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काच्या कारवाईस मंजुरी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे करीत आहेत.





