नवविवाहितांच्या संसारात ‘डिजिटल’ वादळ; मोबाईलमुळे संसार होताहेत उध्वस्त

पुसेसावळी : विवाहानंतरचा काळ म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा, सहवासात आनंद शोधण्याचा आणि एकत्र आयुष्य घडवण्याचा काळ. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे नवविवाहितांच्या नात्यांमध्ये तणाव वाढत असून, अनेक विवाह अल्पावधीतच तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या नवदांपत्यांपैकी अनेक जण मोबाईल आणि सोशल मीडियावरील व्यसनामुळे तणावात गेल्याचे सांगतात. जोडीदाराकडे दुर्लक्ष, सतत मोबाईलवर वेळ घालवणे, संवादाचा अभाव आणि संशयाचे वातावरण ही मुख्य कारणे आहेत.
कोथरूडमधील एका तरुणीने लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यांत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. तिच्या म्हणण्यानुसार, पती रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असे. संवाद होत नसे. जेवताना, फिरायला गेले तरी त्याचे लक्ष मोबाईलमध्येच असे. “मी काय बोलते, कधी रडते, हे त्याला दिसायचंच नाही,” असे तिने न्यायालयात सांगितले.
मानसशास्त्रज्ञ म्हणतात, “मोबाईलवरचा अति वेळ हा मानसिक दुरावा निर्माण करतो. सुरुवातीच्या काळात संवाद आणि एकमेकांची सोबत महत्त्वाची असते. मात्र जोडीदार सतत मोबाईलमध्ये असल्यास, दुसऱ्या व्यक्तीला दुर्लक्षित वाटते. यातून चिडचिड, अविश्वास आणि भांडणं सुरू होतात.”
शिवाय सोशल मीडियावर दुसऱ्यांचे सुखी आयुष्य पाहून स्वतःच्या नात्याविषयी असमाधान वाटू लागते. काही वेळा व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवरील चॅटमुळे गैरसमजही निर्माण होतात. “ती कोण आहे?”, “का हसतो?”, “अशा उशिरा कोणाशी बोलतो?” – असे प्रश्न नात्यात संशय निर्माण करतात.
विशेषतः लॉकडाऊननंतर मोबाइलच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये संवादाऐवजी स्क्रीनवर वेळ घालवण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यामुळे नात्यांमध्ये वास्तवाचा अभाव निर्माण होतो आणि वादाला तोंड फुटते.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात डिजिटल सीमारेषा आखणे गरजेचे आहे. दररोज काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून संवाद साधणं, एकत्र जेवण, फिरायला जाणं आणि एकमेकांचे विचार जाणून घेणं या गोष्टी नातं घट्ट करतात.
कायदे तज्ञ म्हणतात, “मोबाईलमुळे तयार झालेले वाद आता कौटुंबिक न्यायालयांमध्ये एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहेत. यावर समाजातील प्रत्येक स्तराने विचार करणे आवश्यक आहे.”





