पुणे | दस्त नोंदणीवेळी मोबाइल नंबर बंधनकारकच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जमीन व्यवहाराच्या दस्तनोंदणीवेळी खरेदीदार तसेच विक्री करणारे यांनी स्वत:चे अचूक मोबाइल क्रमांक संगणक प्रणालीमध्ये नमूद करणे बंधनकारक झाले आहे. याबाबत भूमि अभिलेख विभागाने दुय्यम निबंधक, मंडल अधिकारी, तलाठी यांना आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे फेरफार व सात-बारा उताऱ्यावरील नोंदीची सद्यस्थिती समजण्यास मदत होणार आहे.
मागील काही वर्षांपासून जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बोगस व्यक्तीला उभे करून जमिनीचे दस्त केल्याचे प्रकार घडतात. दस्त नोंदणी होऊन सात-बारा उताऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे आल्यानंतर जमीन मालकाला फसवणूक झाल्याचे कळते. त्याचबरोबर सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविणे, परस्पर गहाण खत करणे आदी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले. असे प्रकार टाळण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.
नोंदणी विभागाद्वारे “आय-सरिता’ प्रणालीमार्फत करण्यात येणारी दस्त नोंदणी ई फेरफार आणि ई प्राॅपर्टी कार्ड प्रणालीशी संलग्न आहे. नोंदणी झालेला दस्त आॅनलाइन पद्धतीने संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे फेरफार घेण्यासाठी पाठवण्यात येतो. जमीन खरेदी आणि विक्री करणारे यांचे अचूक मोबाइल क्रमांक या प्रणालीमध्ये नोंदविले, तर फेरफर प्रक्रिया सुकर व पारदर्शक होते. यामुळे दस्त नोंदणीवेळी अचूक मोबाइल क्रमांक नोंदवण्याचे आदेश जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
सर्व माहिती अचूक असावी
दस्त नोंदणीसाठीची माहिती दस्त नोंदणी पूर्वी pdeigr.maharashtra.gov.in वर भरताना खरेदीदार व विक्री करणारे आणि इतर संबधित यांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल व पत्ते देण्यात यावे, असे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे.
फेरफार नोटीसची माहिती “एसएमएस’द्वारे
एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदीचा दस्त नोंदवल्यानंतर तो तलाठी कार्यालयाकडे आल्यानंतरयेतो. त्यावर तलाठी सात-बारा उताऱ्यावरील इतर खातेदारांना नोटीस बजावतात. पोस्टाद्वारे नोटीस पाठवण्यात येत असल्याने ती पोहचण्यास कधी-कधी उशीर होतो.
त्यामुळे 15 ते 20 दिवसांत सात-बारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव येणे अपेक्षित असताना नोटीस बजावण्यास उशीर झाला तर उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव येण्यासाठी 40 ते 50 दिवस लागतात. एखादा व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यात अथवा परदेशात असल्यास त्या व्यक्तीला नोटीस वेळेत पोहचत नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता फेरफारची नोटीसची माहिती एसएमएसच्या आधारे पाठविण्यात येणार आहे.





