मोबाइलवरील गेम्सही देऊ शकतात आर्थिक फटका

पिंपरी -अनेक मुले मोबाइलवर गेम्स खेळतात. काही गेम्स प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करताना किंवा ऑनलाइन गेम्स खेळताना वेपन, कॉइन आदी घेतले जातात. पण जर ऍप किंवा मोबाइल नंबर आपल्या बॅंक खात्याशी जोडलेले असेल तर थेट खात्यातून पैसे कट होऊ शकतात. हे टाळण्यासाठी ऑनलाइन गेम्सबाबत मुलांनी व पालकांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात असे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
सध्या बहुतांश लोकांना मोबाइलमधील गेम्सचे आकर्षण आहे. मुलांना तर मोबाइल हातात पडला की केंव्हा गेम्स खेळतोय असे होते. गेल्या दोन वर्षात करोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी घरातील जवळपास सर्वांकडे मोबाइल आला आहे. अनेकांच्या घरी वायफाय सुविधा घेण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन गेम्स खेळताना डाटाची कमतरता भासत नाही. अनेक शालेय व महाविद्यालयीन मुले-मुली या गेम्सबाबत ऍडिक्ट झाल्यासारखे चित्र आहे. लहान मुले प्ले स्टोअरवर जातात व तिथे हवी असेल ती गेम डाउनलोड करुन घेतात.
ही काळजी घ्या
असे प्रकार टाळण्यासाठी शक्यतो स्वतः किंवा मुलांनी ऑनलाइन गेम्स खेळताना मोबाइलमधील सेटिंग बदलावे. गेम खेळताना पैसे कट होणारे नाही, याची काळजी घ्यावी. कॉइन किंवा इतर काही शक्यतो विकत घेऊ नये. मुलांना मोबाइलचा योग्य वापर करण्याबाबत सर्व माहिती द्यावी. आपली मुले मोबाइल वर कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात याबाबत पालकांना माहिती असणे आवश्यक आहे.
अनेक पालकांचे बॅंक अकाउंट मोबाइलमधील विविध ऍपला बऱ्याचवेळा कनेक्टेड असते. अनेक गेम्स तर डाउनलोड करतानाच पैसे पे करावे लागतात. तेंव्हा त्याची रक्कम खात्यातून कापली जाते. काही गेम्समध्ये मुलांना खेळण्यासाठी वेपन, कॉईन, जॅकेट, कॅप, सुरक्षाचक्र, व्हेईकल, मॅजिक पिस्टल यासह अनेक कॉइन घ्यावे लागतात. त्यांची किंमत 50 रुपयांपासून हजारापर्यंत असते. खेळताना मुले हे कॉइन घेतात व त्याचे पैसे खात्यातून कट होतात. या कट झालेल्या पैशांचा मेसेज अनेकवेळा येत नाही त्यामुळे पालकांना कळतही नाही. मॅसेज आला तरी मुले डिलीट करुन टाकतात. जेंव्हा केव्हा बॅंक स्टेटमेंट काढले जाते तेंव्हाच पैसे कट झालेले कळते.




