MNS Candidate List : मनसेचा पहिला उमेदवार जाहीर; राज ठाकरेंनी AB फॉर्म देताच उमेदवाराचा कंठ दाटला

MNS Candidate List : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पहिले पाऊल टाकले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः मुंबईतील नेते यशवंत किल्लेदार यांना AB फॉर्म प्रदान केला आहे. हा मनसेच्या उमेदवार याद्यांमधील पहिला अधिकृत AB फॉर्म मानला जात आहे.
वॉर्ड क्रमांक १९२ (दादर परिसर) मधून यशवंत किल्लेदार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.
AB फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्यासाठी ही अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली. कंठ दाटून आला आहे.”
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि MNS यांच्यातील युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून उमेदवार प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही, तर मनसेकडून ९० जणांना AB फॉर्म वितरित केले गेले असून त्यापैकी ५५ नावे समोर आली आहेत.
हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेचा BMC निवडणुकीतील पहिला मोठा उमेदवार घोषित करण्याचा टप्पा आहे. युतीच्या माध्यमातून मुंबईत ‘मराठी अस्मिता’चा मुद्दा पुन्हा जोर धरताना दिसत आहे.





