राज ठाकरेंकडून मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंत मुदत; वाचा नेमकं काय म्हणाले मनसे प्रमुख

ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
मनसे प्रमुख म्हणाले, भोंग्यांचा आवाज हा बेसूरा असतो, त्यामुळे शांतता बिघडते. इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा, असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही, असे 18 जुलै 2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलेले आहे. आता 3 तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावा, असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे. राज्य सरकारचे हे मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “मशिदींच्या भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतोय. रस्त्यांवरील नमाजामुळे लोकांना त्रास होतोय. राज्य सरकारने याचा सोक्षमोक्ष लावावा, आम्ही आमची भूमिका सोडणार नाही.”





