Mumbai News : मनसेकडून मुंबईत ‘प्रतिपालिका सभागृहाचे’ आयोजन

मुंबई : राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंच्या नेतृत्वात शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, मनसेचा शॅडो कॅबिनेट पॅटर्न फेल झाल्यानंतर आता मुंबईत मनसे कडून “प्रतिपालिका सभागृह” भरवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मनसेच्या वतीने २६ एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेच्यावतीने हे प्रतिसभागृह भरवण्यात आले आहे. त्यासाठी, मसनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडून मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवून सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मनसेकडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येत असून प्रति-महापौरही असणार आहे. तसेच, सभागृहात जनतेच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रति-पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात आले आहे.
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पार्टीचे नेते सईसभाई शेख, काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवााड, राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांसह इतरही पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले. मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे २६ एप्रिल रोजी सायं ५ वाजता मनसेचे पहिले ‘प्रतिसभागृह “भरणार आहे. त्यामध्ये, मुंबईतील रस्ते, आरोग्य, आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.





