“मी तुला विकत घेईन, मनसे नेत्याच्या मुलाचे अर्धनग्न अवस्थेत तरुणीशी अश्लील कृत्य; पक्षाकडून गंभीर दखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने, राहिल जावेद याने, मध्यरात्री मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॉडेल-अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या कारला राहिलने धडक दिली आणि त्यानंतर त्यांच्याशी बाचाबाची करत शिवीगाळ केली.
यावेळी राहिलने स्वतःच्या वडिलांच्या राजकीय ओळखीचा दबदबा दाखवत पोलिसांनाही धमकावले. हा सर्व प्रकार राजश्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओद्वारे उघड केला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर, मनसेच्यावतीने पत्रक काढून संबंधित मुलाचा मनसे पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.
मनसेच्यावतीने परिपत्रक जारी
जावेद शेख हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या मुलाने जे कृत्य केले आहे, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. त्या कृत्याचे समर्थन आमचा पक्ष करत नाही. संबंधित पोलीस यंत्रणांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती, असे परिपत्रक मनसेच्यावतीने मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काढले आहे. त्यामुळे, याप्रकरणी मनसेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
रात्रीच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथे राहिल जावेद याने दारूच्या नशेत राजश्री मोरेच्या कारला धडक दिली. यानंतर त्याने राजश्रीशी वाद घालत, “माझ्या बापाकडून पैसे घे,” असे म्हणत शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, घटनास्थळी दाखल झालेल्या आंबोली पोलिसांनाही राहिलने “माझा बाप मनसेचा बडा नेता आहे,” अशी धमकी दिली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी राहिलविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
हल्ला पूर्वनियोजित, राजश्रीचा दावा
राजश्री मोरेने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा गंभीर दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मराठी भाषा आणि मराठी माणसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला लक्ष्य केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. राजश्रीने आंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संजय निरुपम यांचा मनसेला टोला
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत मनसेला जोरदार टोला लगावला आहे. “मराठी स्वाभिमानाचा दावा करणाऱ्या मनसेच्या नेत्याचा मुलगा मराठी महिलेशी शिवीगाळ करतो आणि बापाच्या नावाचा धाक दाखवतो. हा आहे का तुमची मराठी अस्मिता? मुस्लिमांच्या दबावात मनसे हिंदूंवर हल्ले करणार का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर खळबळ
राजश्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावरून मनसेच्या नेत्यांवर टीकेची झोड उठली आहे. या घटनेमुळे मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आंबोली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

