मुंबई – उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरु झाली. राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पडलेली असताना सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसंवाद यात्रेच्या सभा गाजवायला सुरवात केली. यावरूनच आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. अंधारे जशा सेनेत गेल्या तश्या सेनेतील प्रकाशात असलेल्या महिला कार्यकर्ता अंधारात गेल्या असा टोला महाजन यांनी लगावला आहे. सुषमा अंधारे सध्या राज्यभर फिरून पक्ष संघटना मजबूत करत आहेत. त्यासोबतच शिंदे गटातील आमदार आणि भाजपवर देखील अंधारे कडाडून टीका करताना दिसून येतात. अशात मुंबईत झालेल्या मनसेच्या सभेत बोलताना प्रकाश महाजन यांनी अंधारेंवर जोरदार टीका केली. अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी केलेल्या टीकात्मक विधानांचा यावेळी प्रकाश महाजन यांनी दाखल दिला. ज्या अंधारे यांनी बाळासाहेबांना ८५ वर्षाचा म्हातारा म्हंटल त्यांच्यासाठी शिवसैनिकांना टाळ्या वाजवाव्या लागत आहेत असं महाजन यावेळी म्हणाले.ज्ञानेश्वरांनी रेड्याला शिकवलं परंतु माणसाला शिकवलं नाही अशी टीका अंधारे यांनी केली असल्याचे सांगत महाजन म्हणाले,”रेडा एक सांकेतिक होत त्या काळात ज्याला शिक्षणापासून लांब ठेवलं.. गावकुसाच्या बाहेर ठेवलं अशा समाजासाठी ज्ञानेश्वर माउलींनी सोप्या मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. पण या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही त्याला काय करणार” अशी टोलेबाजी महाजन यांनी यावेळी केली. प्रकाश महाजन यांनी यावेळी सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मासह विविध संतांवर केलेल्या वक्तव्यांचा देखील समाचार घेतला. त्यामुळे आता महाजन यांनी केलेल्या विधानांमुळे महाजन विरोधात अंधारे असा संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.