मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाची स्थापना केली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सूत्र होते. शिवसेनेच्या राजकारणाची संपूर्ण सूत्रे बाळासाहेब पाहत होते. शिवसेना प्रमुखांनी स्वत: कधी निवडणूक लढवली नाही. परंतु पक्षाचा कंट्रोल त्यांच्याकडे होते. म्हणजे एकंदरीत ते किंगमेकरच्या भूमिकेत होते. यानंतर बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या माध्यमातून थेट राजकारणात आले आणि 2019 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीदेखील झाले. मात्र तेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि ती निवडणूक जिंकूनही दाखवली. ते वरळी मतदार संघातून आमदार आहेत. त्यानंतर ठाकरे घराण्यातील आणखी एक युवा नेता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्या नेत्याने स्वत: बैठकीत आपली इच्छा व्यक्त केली. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर हा नेता कोण आहे? तर हा नेता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित राज ठाकरे… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली. या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. अमित ठाकरे कोणता मतदार संघ निवडणार? हे अद्याप त्यांनी सांगितले नाही. त्यांनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय भूमिका घेणार? त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच 2019 मध्ये आदित्य ठाकरे विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हेदेखील पाहणे महत्वाचे असणार आहे.