शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; नियमावली बदलण्याचा दिला इशारा

मुंबई – कोविड- 19 च्या परिस्थितीचा विचार करता यंदाची शिवजयंती 100 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यावर्षी शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. तसेच शिवजयंती संदर्भातील नियमावली बदलण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जाते, यातच मिरवणूक काढू नका, १०० पेक्षा जास्त जणांनी जमा होऊ नये असे आदेश सरकारने दिले आहेत, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवजयंती वर्षातील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करताना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार-हॉटेलची वेळ सारखी वाढवून देणे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली का असा प्रश्न नांदगावकर यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे.3
शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 12, 2021
आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका असा थेट इशाराच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि राज्य सरकारला दिला आहे.




