आघाडी व कॉंग्रेस पक्षात छुपे गद्दार आमदार विकास ठाकरेंचा दावा; विदर्भातील नेत्यांना केले लक्ष्य

नागपूर : नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी पक्षात अनेक छुपे गद्दार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे. येथील झाकीर हुसेन मंचच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात बोलताना आमदार ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातील गद्दारांची यादीच आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांना फोन केले होते. त्यांच्या दबावात अनेकांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले नसल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी लावला आहे. तसेच असे जर झाले नसते तर नागपुरात चित्र वेगळे राहिले असते, असा दावा देखील ठाकरे यांनी केला आहे. आमदार विकास ठाकरे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती.
ठाकरे यांनी यावेळी चांगलीच टक्कर दिली होती, याचा परिणाम म्हणजे गडकरी यांच्या मताधिक्यात तब्बल दीड लाखांची घट झाली. तसेच सर्व वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने तयार देखील झाले होते, मात्र पक्षातील काही छुप्या गद्दारांमुळे पराभव पत्करावा लागला असल्याचे मत ठाकरेंनी जाहीरपणे व्यक्त केले आहे. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते.





