दिल्लीतही उत्तर प्रदेश पॅटर्न? दुकानांसमोर नावाची पाटी लावण्याची मागणी; आमदाराने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

Delhi News | उत्तर प्रदेशमध्ये दुकानांच्या बाहेर दुकानमालकाच्या नावाची पाटी लावण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता उत्तर प्रदेशप्रमाणेच दिल्लीमध्येही नेमप्लेट लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीतील भाजपचे आमदार तरविंदर सिंह मारवाह यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहून नवरात्री आणि ईदच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर नावाची पाटी लावणे अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
भाजप आमदार तरविंदर सिंह मारवाह यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवरात्री आणि ईदच्या निमित्ताने दुकानदारांनी आपापल्या दुकानांबाहेर नावाच्या पाट्या लावाव्यात. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप आमदारांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, जसजशी नवरात्री आणि ईद जवळ येत आहे, तसतसे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की हे उत्सव आपापल्यात आदर आणि सलोख्याच्या वातावरणात साजरे व्हावेत. मी आपल्या कार्यालयाला विनंती करतो की दिल्लीतील सर्व दुकानदारांना नावाची पाटी लावण्याचे निर्देश द्यावेत.
यामुळे नागरिकांना पवित्र वस्तू खरेदी करताना निवड करण्याचा हक्क मिळेल आणि त्यांच्या धार्मिक विधी व श्रद्धांची पवित्रता राखण्यास मदत होईल. तसेच, हे पाऊल पारदर्शकता आणि सांप्रदायिक बंधुता वाढवण्यास मदत करेल., असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, तरविंदर सिंह मारवाह हे भाजपमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2022 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीत जंगपुरा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव केला होता.





