आमदार सुनील शेळकेंच्या आढावा बैठकीला नगरसेवकांची दांडी

वडगाव मावळ, दि. 10 (प्रतिनिधी)- मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.9) वडगाव नगरपंचायतीची आढावा बैठक झाली. या बैठकीला 19 पैकी 9 नगरसेवकांनी दांडी मारली. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा समावेश होता. स्वपक्षीय व अन्य नगरसेवकांच्या या वर्तणुकीची आमदार शेळके यांनी गंभीर दखल घेतली असून, आढावा बैठकीला गैरहजर राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदान करू नका, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
आगामी काळात कालावधीत वडगाव शहरातील विकासकामांसाठी अजून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. तर आढावा बैठकीस गैरहजर असलेल्या सेवकांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आमदार शेळके म्हणाले की आपला प्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांना जर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व शहरातील विकास कामांसाठी वेळ नसेल तर अशा नेत्यांना लोकांनीदेखील मतदान करू नये, असे ते म्हणाले.
वडगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मयूर ढोरे हे थेट जनतेमधून निवडून आले आहेत. तर काही महिन्यांवर या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी विकासकामांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरामधील विविध भागात सद्यस्थितीत सुरू असलेली विकासकामे तसेच प्रलंबित असलेली विकासकामे आणि वडगाव नगरपंचायत प्रशासकीय इमारतीची पाहणी करताना इतर कामकाजांचा आढावा त्यांनी घेतला.
वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मुख्य रस्त्याच्या कामास दोन ते तीन दिवसांत सुरुवात करण्याच्या सूचना संबधितत अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. याव्यतिरिक्त नगरपंचायत पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी जागृत राहून पाण्याच्या पाईप लाईन संबंधित काही किरकोळ दुरूस्ती असतील त्या त्वरीत दुरूस्त करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना येणाऱ्या कालावधीत शहरवासीयांठी कार्यान्वित होणार आहे.
यावेळी वडगाव शहराला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, गणेश म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर व नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.
विचार विनिमयाने प्रश्न सोडविण्याची सूचना
वडगावमधील विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तर काही ठिकाणांचा अपवाद वगळता थोड्याफार परिसरातील व्यक्तींच्या परस्पर जागेच्या अभावी ठराविक विकासकामे रेगांळली आहेत, अशी विकासकामे संबधीत व्यक्तीशी चर्चा विनिमय करून ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी संबंधित कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.





