वडगाव मावळ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार हे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीमध्ये दोन अशासकीय सदस्य असणार आहेत. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार लवकरच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी हे या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. याशिवाय तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किंवा सहाय्यक अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), बाल विकास प्रकल्प मान्यतेने एक अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार या समितीने कामकाज करावे,असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेशात म्हटले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचे काम मावळ तालुक्यात प्रभावीपणे सुरु आहे. अधिकचे नोंदणी केंद्र, योग्य मार्गदर्शन व सहकार्य अशा माध्यमातून जास्तीत जास्त माता-भगिनींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल. – सुनिल शेळके, आमदार