देहूरोडसाठी निधी मिळावा, आमदार शेळकेंची अधिवेशनात मागणी

वडगाव मावळ -नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरी सुविधांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली.

आमदार शेळके म्हणाले, कॅन्टोन्मेंट बोर्ड जरी केंद्राच्या अखत्यारित येत असले तरी तेथील विकासासाठी आवश्यक तेवढा निधी मिळत नाही. बोर्डाचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने या भागातील विकास रखडला आहे.कॅन्टोन्मेंट हद्दीत शेती केल्यास शेतकऱ्यांच्या शेतीची संरक्षण विभागाकडून नासधूस केली जाते. त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा तर मिळत नाहीतच; परंतु त्यांच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या शेतीचेसुद्धा नुकसान केले जाते. बोर्डाच्या हद्दीतील सुविधांसाठी जो आमदार निधी महाविकास आघाडी सरकारने दिला होता, तोदेखील सत्ताधारी सरकारने स्थगित केला आहे.त्यावरील स्थगिती तरी उठवावी, अशी मागणी शेळके यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, याचा सकारात्मक विचार केला जाईल. देहूरोडसह इतर कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कालबद्ध विकास करण्यासाठी नगरविकास खाते नक्कीच पुढाकार घेऊन विकास करेल.





