पिंपरी चिंचवड : बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करावी: आमदार शंकर जगताप यांची मागणी
Updated On:

पिंपरी चिंचवड: चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
३ मार्चपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशाला सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सात वर्ष रखडलेल्या पुलाच्या कामाकडे जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले. थेरगाव येथील प्रसून धाम हाउसिंग सोसायटीजवळून चिंचवड-थेरगाव जोडणाऱ्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामासाठी २०१७ साली धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही निविदा मूळ अंदाजपत्रकाच्या १४% अधिक दराने मंजूर करण्यात आली होती, असा आरोप जगताप यांनी केला आहे.
मूळ निविदेनुसार ठेकेदाराला १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, वेळेत काम न झाल्याने ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम अपूर्ण राहिल्याने सप्टेंबर २०२४ पर्यंतची दुसरी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण न झाल्याने २६ जानेवारी २०२५ पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती जगताप यांनी दिली.
विधानसभेत बोलताना आमदार शंकर जगताप यांनी सुरुवातीच्या अंदाजपत्रकानुसार २५ कोटींच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. तरीही काम वेळेत पूर्ण झाले नाही. परिणामी, महानगरपालिकेने अतिरिक्त ११ कोटी ३ लाख रुपये मंजूर करून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतरही पुलाच्या एका बाजूचे काम अद्याप अपूर्ण आहे. तसेच या प्रकरणात ठेकेदार, कन्सल्टंट आणि संबंधित अधिकारी यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळांचे आश्वासन
आमदार शंकर जगताप यांनी या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.





