हिंगोलीत पुरात अडकलेल्या लोकांना आमदार संतोष बांगर यांनी रेस्क्यू पथकासोबत जाऊन बाहेर काढले

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे पुरामध्ये अडकलेल्या मुलांना काढण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस पथक व रेस्क्यू पथक सोबत घेत चार मुलांना पुरातून सुखरूप बाहेर काढले आहे. आमदार बांगर यांनीही स्वतः बोटीतून मुलांपर्यंत पोहोचून त्यांना धीर दिला हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील 15 तासापासून मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद झाली.
जिल्ह्यातील भोगाव, सावरखेडा पिंपळदरी,जडगाव, टाकळगव्हाण या भागामध्ये नदी नाल्यांना मोठा पूर आला. दरम्यान हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे चार तरुण शेतातील आखाड्यावर जनावरे सोडण्यासाठी गेले होते मात्र यावेळी सावरखेड नजीक असलेला जुना पूल पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला. त्यामुळे पाण्याचा लोंढा वाढल्याने आखाड्याला वेढा पडला.
या पुरामध्ये चार तरुण अडकून पडले या घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वाढीव पोलीस बंदोबस्त व रेस्क्यू पथक सोबत घेत घटनास्थळ गाठले. तसेच आमदार संतोष बांगर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर आमदार संतोष बांगर व पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी रेस्क्यू पथकाला तातडीने आखाड्याकडे रवाना केले. पुराच्या पाण्यात अडकलेले तरुण घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे स्वतः आमदार संतोष बांगर बोटी मधून तरुणांपर्यंत पोहोचले त्यानंतर या तरुणांना सुखरूप बाहेर काढले.





