Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ‘या’ नेत्याची मुख्य प्रतोद पदी केली नियुक्ती

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची निवड केली आहे. रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे मुख्य प्रतोद पदी निवड झाल्यानंतर लगेच रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे.
रमेश बोरनारे यांनी काय व्हीप केला जारी?
“शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की, शनिवारी, 7 डिसेंबर 2024 पासून मुंबईत विधान भवन येथे विधिमंडळाचं विशेष अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे”, असे मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये म्हटलं आहे.
कोण आहेत रमेश बोरनारे ?
रमेश बोरनारे हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं त्यावेळी रमेश बोरनारे यांनी त्यांना खमकी साथ दिली होती. गुवाहाटीला जाणाऱ्या 40 शिवसेनेच्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचादेखील समावेश होता.





