Satara News : आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेची जगाच्या पटलावर दखल

कोरेगाव : फुलशेती उद्योगाचे रक्षण करण्यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवला असून प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्लॅस्टिक फुले महाराष्ट्राच्या बहरलेल्या फुलशेती उद्योगाला गुदमरुन टाकत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जागतिक पातळीवर ‘फ्लोरल डेली’ या नियतकालिकेने या भूमिकेची दखल घेतली असून आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
आ. महेश शिंदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मागणीची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असल्याने आता प्लॅस्टिक फुलांवरील बंदीच्या विषयाला मोठी ताकद मिळाली आहे. पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. समाजकारण आणि राजकारणापलीकडे जाऊन विचारधारा जोपासत सर्वसामान्य शेतकरी, पर्यावरणपूरक शेती आणि सेंद्रिय शेती या विषयावर आ. शिंदे अभ्यास करत असतात.
सध्या प्रदेशात बंदी घातलेली कृत्रिम फुले भारतात मात्र विशेष करून महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात. या कृत्रिम फुलांचा वापर किती भयानक आहे, याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन महेश शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला. कृत्रिम फुलांचा सार्वजनिक आरोग्यावर, पर्यावरणावर आणि फुलशेतीशी संबंधित हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती देऊन चिंता व्यक्त केली.
‘फ्लोरल डेली’ या नियतकालिकेने याविषयी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये आमदार महेश शिंदे यांनी केलेले मागणी विस्तृतपणे नमूद केली आहे. कृत्रिम फुलांमध्ये टायटॅनियम डायऑक्साइडसारखे विषारी पदार्थ असतात. जे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात.
‘काही युरोपीय देशांनी आधीच प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी घातली आहे. आता आपणही तेच करण्याची वेळ आली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार निश्चितपणे या विषयात गंभीर असून लवकरच पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे.
जिल्ह्यात फुलांची निर्मिती नामशेष होण्याच्या मार्गावर
सातारा जिल्ह्यातील फुलशेतीवर आलेल्या संकटाचा उल्लेख करत आमदार महेश शिंदे यांनी एकेकाळी भरभराटीला आलेला फुलशेती उद्योग जवळजवळ कोसळला असल्याचे निदर्शनास आणून दिले. ‘‘फुलशेतीसाठी समर्पित सुमारे १३०० ग्रीन हाऊस जिल्ह्यात होते. आज ५० पेक्षा कमी शिल्लक राहिले आहेत,’’ असे त्यांनी उघड केले. एकेकाळी ३७५ ग्रीन हाऊस असलेल्या एकट्या वर्णे गावातच फुलांची निर्मिती आणि व्यापार आता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असेही त्यांनी सांगितले.





