रायगड – दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर महायुतीतील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्हायात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले आहे. रायगडचे पालकमंत्री पद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकमेव निवडून आलेल्या आदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी काल पासून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य थोरवे यांनी केले आहे. थोरवे यांच्या या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उठावात रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा आहे. सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्या नेतृत्वात आम्ही होतो. खरेतर मागच्या वेळेस मंत्रिपदाचे दावेदार असताना भरत गोगावले यांनी संघटनेला बळ देण्यासाठी मागच्या वेळेस मंत्रिपदाचा त्याग केला. खर त्यावेळेस भरत गोगावले पालकमंत्री झाले असते, असे थोरवे म्हणाले. राज्यात सरकार येण्यासाठी आम्ही जो उठाव केला आणि जे काही परिवर्तन झाले त्यामुळेच सरकार बसल्याचे थोरवे म्हणाले. खाते कोणते दिले यांबाबत मी काहीच बोलणार नाही. परंतू, भरत गोगावले यांना कॅबिनेटमंत्री केले तेव्हा आमची सर्वांची एकच मागणी होती की पालकमंत्री देखील गोगावले यांनाच दिले पाहिजे. आघाडी सरकार असताना उध्दव ठाकरे यांनी सेनेचे 3 आमदार असताना चुकीचा निर्णय घेतला होता. त्याविरोधातही आम्ही उठाव केला होता, असे थोरवे म्हणाले. गोगावले यांना का डावलले? राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाले परंतु भाजप आणि सेनेचे तीन तीन आमदार असताना सुध्दा गोगावले यांना का डावलले? असा सवाल यावेळी थोरवे यांनी केला. गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आमची सर्वांची मागणी असताना सुध्दा असा निर्णय का घेण्यात आला? असा सवाल थोरवे यांनी केला. फडणवीस आणि शिंदे साहेब यांना आम्ही एकमताने भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत सुध्दा सांगितलेले असताना असा निर्णय अपेक्षित नव्हता असे थोरवे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी फोन करून फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोअसला गेलेले असताना पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्यांवरून नाराज झालेले एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याचे सांगितले जाते. तिकडूनच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांची नाराजी लक्षात घेऊन दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची निवड रद्द – रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.