पुणे जिल्हा | आमदार भरणे महामेळाव्यात पावसात भिजले

इंदापूर, (प्रतिनिधी) -आपल्या नेत्यासाठी ऊन, वारा, पावसाची कोणतीही तमा न बाळगता माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी बारामती येथे झालेल्या जनसन्मान महामेळाव्यात थेट सामान्य जनतेत, पावसात उभे राहून मेळाव्यास दाद दिली. उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी हे चित्र पाहून आमदार भरणे यांचे कौतुक केले आहे.
बारामती येथे (14 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी जन सन्मान महामेळाव्यास व जाहीर सभेस आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे स्टेजवर खुर्चीवर न बसता सामान्य जनतेत भर पावसात, आपल्या नेत्यासाठी उभे राहून सभेला दाद देत होते. हे पाहून सामान्य आमदार ही प्रतिमा काय असते हे उपस्थितांना लक्षात आले.
आमदार भरणे म्हणाले की, जनसामान्य जनता हीच खर्या अर्थाने नेत्याची ताकद असते. नेता घडवण्याची भूमिका जनताच घेत असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसात कायमच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सवय लागलेली आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला राज्य शासनाचा कसा फायदा होईल. गोरगरीब जनता कशी सुखी होईल यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार व, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काम पाहत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यास मोठा हातभार देणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेला शब्द देतात. तो खरा करतात. त्यामुळेच दादांवर जनता कायम प्रेम करते.
कार्यकर्ते पदाधिकारी यांचा प्रतिसाद
बारामती येथे झालेल्या महामेळाव्यास आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराशी एकनिष्ठ असल्याचे दिसून आले.





