आमदार बच्चू कडू म्हणाले… जय जवान! जय किसान!

मुंबई: आज विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी जे सतत लढत असतात असे बच्चू कडू यांनी शपथ घेतली. बच्चू कडू सत्तेत सहभागी असून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी बच्चू कडू सतत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. शपथेचा शेवटी त्यांनी जय जवान! जय किसान! नारा दिला.
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. तसेच ‘प्रहार जनशक्ती पक्षाचे’ ते संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रहारच्या माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यानी केलेल्या शोले आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले.
विरोधात असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच महाराष्ट्रात ओला दुःष्काळ जाहीर करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुंबईमध्ये मोर्चा देखील काढला होता. दरम्यान त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बच्चू कडू यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. ‘शिवसेना का घाबरेल? शिवसेनेत तर सगळे वाघाचे बछडे आहेत’, अशी प्रतिक्रिया त्यांनी मातोश्री वरून दिली होती. तसेच आपण शेतकऱ्यांसाठी शिवसेनेसोबाबत आल्याचे कडू म्हणाले होते.





