वरळीतील हिट अँड रन प्रकरणावर आमदार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मागील काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या. यातच आज सकाळी मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याने यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती जखमी झाला आहे. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर होता असा आरोप होत आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. याप्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय.
उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं… सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने…— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2024
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले की, “मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय. उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं… सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं. पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत. अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल.” पुढे त्यांनी लिहिले की, “मुंबईची वाहतुक शिस्त आणि सुरक्षा परत आणायला लागेल. वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चूका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, ह्याची काळजी घ्यावी लागेल.”
नेमकं काय घडलं?
ॲट्रिया मॉलजवळील एक कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे ५.३० च्या सुमारास कारने या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. मात्र महिलेचा पती बाजूला पडला तर, महिलेला चालकाने फरफटत नेले. यात महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता.





