Mithila Palkar: ८ वर्षांनंतर मिथिला पालकरचा मोठ्या पडद्यावर कमबॅक; आमिर खानच्या सिनेमाच्या सेटवर होते खास नियम

Mithila Palkar : सुमारे दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘कप सॉंग’मुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनयातील सातत्य, मेहनत आणि संयमाच्या जोरावर मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत पोहोचलेली मिथिला आता आमिर खान निर्मित हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘हॅपी पटेल’ या हिंदी कॉमेडी चित्रपटातून मिथिला कमबॅक करत असून या सिनेमात अभिनेता वीर दास प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे वीर दासनं या चित्रपटाचं सह-दिग्दर्शनही केलं आहे. आठ वर्षांनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा मिथिलाचा पहिला हिंदी चित्रपट असून, तिच्यासाठी हा केवळ कमबॅक नसून एक नवी सुरुवात असल्याचं ती म्हणते.
View this post on Instagram
एका मुलाखतीत मिथिलानं सांगितलं की, “हा माझा पहिला मोठा कॉमेडी सिनेमा असल्यामुळे थोडी भीती होती. कॉमेडी करणं सोपं नसतं. मात्र वीर दासचं मार्गदर्शन खूप उपयोगी ठरलं. ‘जाणीवपूर्वक विनोद करू नकोस, संवाद प्रामाणिकपणे म्हण, विनोद आपोआप तयार होईल’ असा सल्ला त्यानं दिला.”
चित्रपटाच्या सेटवरील अनुभव सांगताना मिथिला म्हणाली की, या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक महत्त्वाचा नियम पाळण्यात येत होता. तो म्हणजे सेटवर मोबाईल फोन वापरण्यास मनाई होती. “आजकाल मोबाईलमुळे प्रत्येक जण आपापल्या जगात असतो. मात्र या सेटवर आम्ही सगळे एकमेकांशी संवाद साधत होतो. गप्पा, गाणी, खेळ, एकत्र जेवण अशा गोष्टींमुळे टीम म्हणून काम करत असल्याची भावना निर्माण झाली,” असं ती म्हणाली.
इतकंच नव्हे तर या चित्रपटासाठी कलाकारांची वैयक्तिक हेअर-मेकअप टीमही नव्हती. सगळ्यांसाठी एकच कॉमन मेकअप टीम होती आणि सर्व कलाकार एकाच व्हॅनिटी व्हॅनचा वापर करत होते. त्यामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्स यांच्यात अधिक आपुलकीचं आणि सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं मिथिलानं सांगितलं.
‘हॅपी पटेल’ या चित्रपटात मिथिला पालकरसह मोना सिंग आणि शरीब हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आमिर खान निर्मित हा चित्रपट १६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





