शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीगावातील होनेवाडी परीसरातील एका तरुणाने खोटी माहिती देत पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डायल ११२ या आपत्कालीन सेवेला खोटा कॉल करून खळबळ उडवून दिली. प्रसाद भानुदास देशमुख (वय २६, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असं BNS २१२(a) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष सुभाष बनसोडे (वय ३३ वर्ष ) शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद देशमुख याने आपल्या मोबाईलवरून गौरव हारदे (रा. राहुरी) या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून, “मला शेतकरी नवनाथ शंकर होणे व इतर आठ जणांनी किडनॅप केले आहे. माझ्याकडे ते पाच लाख रुपयांची मागणी करत आहेत,” अशी खोटी माहिती दिली. या माहितीवर विश्वास ठेवून आरोपीच्या कंपनीतील सहकारी पंकज शिंदे (रा. नारायणगाव) यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिस यंत्रणेला चुकीच्या दिशेने वळवले. मात्र, पोलिसांच्या तात्काळ तपासात हे सर्व प्रकरण खोटे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे सरकारी यंत्रणेचा वेळ व संसाधनांचा गैरवापर झाला असल्याने आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शिरूर पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, खोट्या माहितीवर आधारित अशा प्रकारांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.